epapernagaridavandi 15-04-2020 breakingnews

                                 राज्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. मल्लीकार्जुन पट्टनशेट्टीकडे तक्रार
                                                  जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांची हेळसांड!

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः आरोग्य अधिकार्‍यावर कचरा असणार्‍या रूममध्येच उपचार करण्यात येत असतील तर सर्वसामान्य रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात कसा उपचार होत असेल, रुग्णांची कशाप्रकारे हेळसांड होत असेल याबाबत राज्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. मल्लिकार्जुन पट्टनशेट्टी यांचेकडे एका वैद्यकीय अधिकार्‍याने तक्रार केली असून आरोग्य उपसंचालकांनी या तक्रारीची दखल घेऊन सुधारणा करण्याचे आदेश जिल्हा रुग्णालयास दिले आहेत.अहमदनगर जिल्हा रुग्णालयात रुग्णांकडे दुर्लक्ष, अस्वछता, निकृष्ट जेवण, वैद्यकीय अधिकार्‍यांचा वेळकाढूपणा याचा अनुभव खुद्द क्वारंटाईन करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वसंत जमदाडे यांना आणि कर्मचार्‍यांनाच येत आहे. त्यामुळे या रुग्णालयात सर्वसामान्यांची काय स्थिती असेल,असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत आरोग्य उपसंचालक डॉ. मल्लिकार्जुन पट्टनशेट्टी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णांची व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 28 वर गेलाआहे. त्यातच सकाळी एका महिलेचाही मृत्यू झाला, असे असले तरी जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाला याचे कुठलेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. नेवासा तालुक्यातील एक रुग्णाला श्रीरामपूरातील डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्या थेट संपर्कात आलेले तीन डॉक्टर तसेच दोन परिचारिका याना तातडीने जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले. त्यांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून उद्या बुधवारी अहवाल येणे अपेक्षित आहे. याशिवाय आणखी सहा जणांचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, तीन वैद्यकीय अधिकारी आणि दोन परिचरिकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करन्यात आले. मात्र तेथे त्यांना  साडेचार तास त्यांना ताटकळत ठेवत त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कोरोना रुग्णाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील या व्यक्ती असतानादेखील कुठलेही गांभीर्य दाखवले गेले नाही. शेवटी याच अधिकार्‍यांनी तेथे उपस्थित कर्मचार्‍यांना मदत सुरू केली. स्वतःच फॉर्म वगैरे भरून औपचारिक प्रक्रिया पूर्ण करून स्वतःला दवाखान्यात भरती करून घेतले. त्यानंतरही प्रशासनाकडून कुठलीही तत्परता दाखवली गेली नाही. रुग्णालयात कमालाची अस्वच्छता असून दाखल रुग्णांकडे लक्ष द्यायला कर्मचार्‍यांकडे वेळ नाही. रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी सकस अन्न देणे बंधनकारक असतानाही अतिशय निकृष्ट जेवण दिले जाते. स्थानिक वैद्यकीय अधिकार्‍यांनी रात्री रुग्णालयात थांबणे अपेक्षित असताना बाहेरून आलेल्या डॉक्टरांच्या भरवशावर रात्री रुग्णालय असते. त्यांना येथील व्यवस्थेबद्दल काहीही माहिती नसते.याबाबत श्रीरामपूरच्या या अधिकार्‍याने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यांनी थेट राज्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. मल्लिकार्जुन पट्टनशेट्टी यांच्याकडे तक्रार केली. सर्व बाबी त्यांच्या कानावर घालून अहोरात्र रुग्णांसाठी झटणार्‍या आमच्यासारख्या वैद्यकीय अधिकार्‍यांनाच इतकी वाईट वागणूक मिळत असेल तर सामान्य रुग्णांचे किती हाल होत असतील, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या तक्रारीची दखल घेत डॉ. पट्टनशेट्टी यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयास सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.